कोण आहेत 'ठग्स ऑफ महाराष्ट्र' ? विरोधकांची बॅनरबाजी

Foto
मुंबई- रविवारी मुंबई येथे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत काय झालं यापेक्षाही तिथे लावलेल्या बॅनरचीच चर्चा सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे. या परिषदेच्या वेळी अमीर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपाटाचे पोस्टर कॉपी करत विरोधकांनी 'ठग्स ऑफ महाराष्ट्र'चे बॅनर तयार केले आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना ठगांच्या रुपात दाखवले आहे.
या बॅनरवर आमिर खानच्या जागी देवेंद्र फडणवीस आणि अमिताभ बच्चन यांची जागी उद्धव ठाकरे यांचे फोटो लावलेले आहेत. ठगबाजीची चार वर्षे असे टायटल या बॅनरला दिले गेले आहे. सोमवार पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यासाठी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. 
सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या सरकारला चार वर्षाचा कार्यकाळाला विरोधकांनी ठगबाजीची चार वर्षे असे संबोधले आहे. शेतकऱ्यांशी ठगबाजी, ग्राहकांशी ठगबाजी, भावनिक ठगबाजी, बेरोजगारांशी ठगबाजी आशा वेगवेगळ्या शीर्षकाखाली ही बॅनर बनवून सरकारवर बोचरी टीका विरोधकांनी केली आहे.